व्यक्तिगत – रमेश पानसे
शिक्षणतज्ञ रमेश पानसे हे महाराष्ट्राला संस्थापक,वक्ता कवी, वैचारिक लेखक, संपादक अशा अनेक भूमिकांतून परिचित आहेत. ‘सर’, अशी त्यांना हाक मारत, कोणीही त्यांच्याशी शिक्षण, धर्म, साहित्य, समाज या विषयांवर चर्चा करू शकते,त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे हजारो लोक त्यांच्याशी जोडलेले आहेत. त्यांचा सर्वात आवडता उद्योग म्हणजे स्वत: अभ्यास करत राहणे आणि इतरांना अभ्यासासाठी प्रवृत्त करत राहणे. बालशिक्षण, शिक्षण, मेंदूविषयक संशोधन,रचनावादी शिक्षण,भाषाशिक्षण हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. महाराष्ट्र शासनाने २०१० मध्ये स्वीकारलेल्या रचनावादी शिक्षणपद्धतीचा त्यांचा अभ्यास मागील १५ वर्षे चालू आहे. त्या शिक्षण पद्धतीचे अनेक नमुने त्यांनी उभे केले आहेत.
१९६८ ते १९९१ या काळात ते मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि विभागप्रमुखही होते. अनुताई वाघ यांच्या प्रेरणेने, आदिवासी भागात त्यांनी बालशिक्षण कार्याला सुरुवात केली. यासाठी प्राध्यापकी सोडली. कोसबाड येथील ‘ग्राम बाल शिक्षा केंद्रा’चेही ते संचालक होते. १९८२मध्ये ‘ग्राममंगल’ या संस्थेची त्यांनी स्थापना केली. या संस्थेचे काम डहाणू तालुक्यातील आदिवासी भागात सुरु झाले. तेथे नव्या शिक्षण पद्धतीचे अनेक प्रयोग उभे राहिले.ज्या आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सुरु झालेल्या प्रयोगांचे मोल सार्वत्रिक आहे हे लक्षात येऊन मागील २० वर्ष संस्था महाराष्ट्रभर शिक्षक प्रशिक्षणाचे काम करीत आहे. विश्वस्त म्हणून ते आजही उत्साहाने काम करीत आहेत. अर्थशास्त्र,शिक्षण,साहित्य या विषयांवरील ५२ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.‘शिक्षण-आनंद क्षण’, ‘नयी तालीम’,‘कर्ता करविता’,‘विचार फुले’, ‘बालशिक्षण स्वरूप व नवी दिशा’ ही त्यांची गाजलेली पुस्तके. या पुस्तकांमध्ये अनेक शैक्षणिक विचार, अनेक सिद्धांतांचे विवेचन आणि त्याविषयीचे अनुभव वाचायला मिळतात. शिक्षणसंस्थांचे संचालक,शिक्षक यांना ही पुस्तके खूपच मार्गदर्शक ठरतात. तसेच मुलांच्या विकासात योग्य रीतीने साहाय्य करण्यासाठी या पुस्तकांचा वापर पालकांनाही होतो. त्यांच्या पुस्तकांचा आणि कार्याचा सन्मान करणारे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
शैक्षणिक कामाबरोबर त्यांचा इतरही कामात महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी ‘ऋचा’,‘अर्थबोधपत्रिका’ ‘शिक्षणपत्रिका’, ‘शिक्षणवेध’ या मासिकांचे संपादन केले. ‘मराठी अर्थशास्त्र परिषद’,‘महाराष्ट्र ग्रामीण विकास परिषद’,‘महाराष्ट्र बालशिक्षण परिषद’ या संस्थांची स्थापना केली. लातूर भूकंप पुनर्वसन कार्यात शासनाचे सल्लागार, गांधी फिल्म् फाऊंडेशनचे विश्वस्त, अशी अनेक कामे समर्थपणे उभे करणारे ते एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.