



रमेश पानसे महाराष्ट्रात शिक्षणतज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. त्यांचे संस्थापक, वक्ता, कवी, वैचारिक लेखक, संपादक असे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळतात. स्वत: अभ्यास करत राहणे आणि इतरांना अभ्यासासाठी प्रवृत्त करत राहणे यामुळे हजारो लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. बालशिक्षण, शिक्षण, मेंदूविषयक संशोधन, रचनावादी शिक्षण, भाषाशिक्षण हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. महाराष्ट्र शासनाने २०१० मध्ये स्वीकारलेल्या रचनावादी शिक्षणपद्धतीचा त्यांचा अभ्यास मागील १५ वर्षे चालू आहे. त्या शिक्षणपद्धतीचे अनेक नमुने त्यांनी उभे केले आहेत.
अभिप्राय

डॉ. अनिल काकोडकर
"साधारणत: ३ ते ६ हा प्राथमिक शाळेतील प्रवेशापूर्वीचा वयोगट. या वयोगटातील मुलांनी घरातील समृद्ध अनुभव विश्वाबरोबरच प्रशिक्षित शिक्षकांकडून; शिकण्याच्या सोयींचे महत्त्व एक राष्ट्र म्हणून आतांआता आपल्या लक्षांत येत आहे. तसं पाहिलं तर बालशिक्षणाच्या विकासाची आपली परंपरा प्रदीर्घ आणि समृद्ध आहे. समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहचू शकणारे व स्थानिक परिस्थितीशी अनुरूप असणारे बालशिक्षण विकसित करण्याचा सर्वांगीण कार्यक्रम नेटाने पुढे नेण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य घालवले, अशा निवडक धुरिणांत पानसे सरांची गणना होते. आज कार्यरत असलेल्या मंडळींचे तर ते अग्रणी मार्गदर्शक आहेत. पानसे सरांच्या नेतृत्वाखाली ग्राममंगलने बालशिक्षणाच्या विस्तृत कामाचे एक उत्कृष्ट आणि सफल उदाहरण आपल्यापुढे ठेवले आहे. त्याचा सर्वदूर विस्तार होणे गरजेचे आहे."

डॉ. हेमचंद्र प्रधान
"प्रा. रमेश पानसे हे महाराष्ट्रात आता मुख्यत्वे शिक्षणतज्ज्ञ म्हणून विख्यात असले तरी त्यांची ओळख - अर्थशास्त्राचे प्राध्यापक, साहित्याचे उत्तम जाणकार, तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते, ग्राममंगलचे पद्मश्री अनुताई वाघ यांच्याबरोबरचे सहसंस्थापक, महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे नेता-निर्माता, अर्थबोधपत्रिका, बालशिक्षणपत्रिका आणि शिक्षणवेध यांचे कुशल संपादक, गांधीविचारांचे सखोल अभ्यासक, भारतांतील अनोख्या शैक्षणिक प्रयोगांचे समालोचक, शिक्षणक्षेत्रांतील नामांकित विचारवंत - अशी बहुआयामी आहे. आदिवासी क्षेत्रातील ग्रामविकासाच्या कामाचे एक अविभाज्य अंग म्हणून ते बालशिक्षणाकडे वळले. तेथे त्यांनी केलेल्या उपक्रमांना एकाच वेळी स्थानिक गरज पूर्ण करण्याचे आणि जागतिक शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे अशी दोन्ही परिमाणे होती. त्यासाठी त्यांनी जागतिक स्तरावर चाललेल्या संशोधनाचा मागोवा घेतला आणि ज्ञानरचनावाद तसेच मेंदूआधारित बालशिक्षण मराठीत प्रथम आणले. सध्या या दोन्ही शैक्षणिक भूमिकांचा प्रसार व्हावा याकरता वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी ते अखंड चिंतन, लेखन, भाषण,प्रयोग यांत गुंतून गेलेले आहेत. त्यांना मन:पूर्वक अभिवादन. "

डॉ.वर्षा भगत
"साधारणतः २००१ साली एका शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने ग्राममंगलच्या ऐना येथील उपक्रमाला भेट देण्याचा योग आला. तेव्हापासून ग्राममंगल आणि पानसे सर या दोन्ही गोष्टींमुळे मी अक्षरशः भारावून नाही तर वेडावून गेले आहे. पुढे ग्राममंगल सोबतचं औपचारिक-अनौपचारिक काम आणि पानसे सरांशी संपर्क वाढत राहिला, हे माझे अहोभाग्य. एव्हाना मला हे कळून चुकले आहे की, पानसे सरांना तर वय नाहीच ! अविरत, अविचल काम करणारे, आयुष्याचा प्रत्येक क्षण ध्येयवेडे होउन जगणारे, अगणित तरुणांना प्रेरणा देणारे पानसे सरांचे काम पाहून ‘आयुष्य वसूल होणे’ म्हणजे काय हे कळते. शासकीय सेवेत अनेक अनावश्यक प्रसंगांना तोंड देताना पानसे सरांचा ‘लढायचंच ‘ असे हक्काने सांगणारा मायेचा, धीराचा खंबीर हात डोक्यावर असतोच. भविष्यातही सरांचे आशीर्वाद असेच असावेत. सरांना अभिमान वाटावा असे काम माझ्या हातून घडत रहावे, इतकी इच्छा नक्कीच आहे."

डॉ. विवेक सावंत
"आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर पानसेसर अधिक आकर्षक अशा इतर अनेक कार्यक्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवू शकले असते आणि लौकिकार्थाने अधिक सुखकर असे ऐहिक जीवन जगू शकले असते. पण तो मोह त्यांनी टाळला. ‘बालशिक्षण हेच तुझे लाईफ-मिशन आहे’ असे सांगणाऱ्या आपल्या ‘आतल्या आवाजा’ला त्यांनी संवेदनशीलपणे प्रतिसाद दिला. हे बालशिक्षण क्षेत्राचे आणि महाराष्ट्राचे भाग्य. उत्साही आणि निगर्वी, मिश्किल, रसिक आणि संवादकुशल अशा त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे तसेच त्यांच्या व्यासंगी, विवेकनिष्ठ, ध्येयवादी, धाडसी, निग्रही आणि लोकसंग्रही वृत्तीमुळे गेली चार दशके त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील बालशिक्षण कार्याची व्याप्ती आणि खोली वृद्धिंगत होत राहिली आहे. "

डॉ. कुमार सप्तर्षी
"रमेश पानसे हे माझे बर्याच वर्षांपासूनचे मित्र आहेत. आम्ही गांधीवादी विचारांची मंडळी महात्मा गांधीच्या ‘नयी तालीम’ या शिक्षणपद्धती बद्दल मानत कामाचे आकर्षण बाळगतो. पानसे सरांची नयी तालीम या शैक्षणिक प्रयोगावरील पुस्तक वाचून आमची ही गट्टी जमली. त्यानंतर मी त्यांची पुण्यातील शाळा पाहायला गेलो. त्यांच्या परीने ते नव-नवीन प्रयोग करीत होते तथापी ती शाळा फ्लॅटमध्ये होती आणि शाळेला क्रीडांगण नव्हते. या दोन मोठ्या उणिवा पाहून मी त्यांना गांधीभवन परिसरातील जागा देऊ केली. त्यानंतर गोष्टी भराभर घडल्या अणि गांधीभवनच्या परिसरात ग्राममंगलचे ‘शिकते घर’ चालू झाले. मराठी माध्यमाच्या नवीन शाळांना शासकीय आयोगाने मान्यता दिली नाही त्यावेळी अनेक समस्या निर्माण होत्या. त्यावर मात करण्यासाठी पानसे सरांनी आझाद मैदान उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मंत्री महोदय भेट देणार होते. पानसे यांनी त्यासाठी मला बोलवून घेतले. त्यावेळी झालेल्या चर्चेत मी सहभागी होतो. शासनाने त्या मागण्या मान्य केल्या. पानसे हे सत्शील, हसतमुख अणि आपल्या विषयावर पूर्ण बुद्धी केंद्रित केलेले व्यक्तिमत्त्व आहे. शिक्षण क्षेत्रात सतत नव-नवे प्रयोग करण्यात ते आघाडीवर असतात. त्यांची प्रयोगशीलता लोभस आहे. एकाच वेळी शहरातील अणि आदिवासी पाड्यातील मुलांच्या शिक्षणाचा विचार करताना त्यांच्यातील संवेदनशीलतेचा प्रत्यय येतो. त्यांचे लोभस व्यक्तिमत्त्व, सत्याचा आग्रह धरणारा हसतमुख स्वभाव असाच राहो आणि प्रयोगशीलतेमुळे त्यांच्या कार्याला वेग-वेगळे परिमाण लाभोत, या शुभेच्छा |"